यवतमाळ - कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाच महिन्यांपूर्वी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती. याचा फटका सर्वच व्यावसायिकांना सहन करावा लागला. मग त्यातून लग्नात वरातीसाठी लागणारे घोडे भाड्याने देणारे, बग्गीवाले सुद्धा सुटले नाही. गेल्या साडेपाच महिन्यांपासून हे घोडे जागेवरच बांधले त्यांचे उत्पन्नच थांबले आहे. परिणामी घरातील दागिने गहाण ठेऊन बग्गीवाल्यांना घोड्यांची देखभाल करावी लागत आहे.
जिल्ह्यात कित्येक जण वर्षांपासून बग्गीचा व्यवसाय करुन आपली उपजीविका भागवतात. हे व्यवसायिक लग्नामध्ये वरातीसाठी लागणारे घोडे भाड्याने देतात. पाच ते सहा महिने हा व्यवसाय करुन पाच ते सात लाख रुपयांची कमाई करतात. त्यावरच घरातील वर्षभराचे सण, मुलांचे शिक्षण करतात. मात्र, आता टाळेबंदीमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. इतर व्यावसायिकांप्रमाणे यांच्यातही स्पर्धा असते. आपल्याकडे ग्राहकांना आकर्षित करणारे घोडे असावे म्हणून ते धुळे, मालेगावहून 3 ते 4 लाख रुपये किंमत असलेला घोडा खरेदी करून आणतात. त्यांना इशाऱ्यावर नाचायला शिकवतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभावर सरकारने बंधने घातल्यामुळे घोडे जागेवरच उभे आहेत.