यवतमाळ - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून चक्क दोन कोटी रूपयांना दिल्लीतील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला अवघ्या २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या तरुणाकडून एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांची रोख हस्तगत करण्यात आली. संदेश मानकर (रा. अरूणोदय सोसायटी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी दिली. रजत गोयल (रा. दिल्ली) असे फसवणूक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
हे ही वाचा -tokyo paralympics : कृष्णा नागरचा सुवर्णभेद; तर सुहास यथिराजने पटकावलं रौप्य
पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे -
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ यांनी चौकशी करून अज्ञातावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर यवतमाळ सायबर सेलने याबाबत चौकशी सुरू केली असता, डॉ. गोयल यांची फसवणूक करणारी तरूणी नसून तरूण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून पोलिसांनी एक पथक तयार करून अरूणोदय सोयायटीतील एका संशयित तरुणाच्या घरी धाड टाकली. यावेळी संदेश मानकर या तरूणाला ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी सुरू केली असता, त्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले.
हे ही वाचा -राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा पोलिसांनी घेतला धसका, नृसिंहवाडीत पोलिसांचा फौजफाटा तैनात
पावणेदोन कोटी रुपयांचा मुद्धेमाल हस्तगत -
या प्रकरणी पोलिसांनी त्या तरूणाकडून एक कोटी ७२ लाख ७०० रूपये रोख, चार लाखाचे सोन्याचे दागिने, चार विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण एक कोटी ७६ लाख ६ हजार १९८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, गजानन करेवाड, विवेक देशमुख, पथकातील गजानन डोंगरे, विशाल भगत, उल्हास कुरकुटे, महमद भगतवाले, सलमान शेख, किशोर झेंडेकर, पंकज गिरी, रोशनी जागळेकर, प्रगती यांनी यशस्वीरित्या पार पाडली.