यवतमाळ - रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर कारवाई करण्यास गृहविभागाने हलगर्जीपणा केला, असा आरोप माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांनी केला आहे.
डॉ. पायल तडवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे. मात्र, गृह विभागाने संबधित आरोपींना अटक करण्यासाठी तब्बल 7 दिवस लावले आहेत. ते उच्चवर्णीय असल्यानेच गृहविभाग त्यांना अटक करण्यात धजावत नव्हते. संबंधित महिला आरोपींना अटक करण्यात आली तरी त्यांना जामीन मिळण्यात येऊ नये, अशी मागणी शिवाजीराव मोघे यांनी केली आहे.
तडवी आत्महत्या प्रकरणी गृह विभागाचा हलगर्जीपणा; शिवाजीराव मोघेंसह वसंत पुरकेंचा आरोप त्याबरोबरच न्यायालयात आरोपींविरुद्ध 302 चा खटला चालवण्यात यावा, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या संबंधित महिला डॉक्टरांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे, डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबीयांना हा खटला चालवण्यासाठी शासनाने आर्थिक मदत द्यावी, कुटुंबीयांनी सुचविलेला वकील हे प्रकरण न्यायालयात चालवण्यासाठी देण्यात यावा, या प्रकरणाचा निपटारा जलदगती न्यायालयात करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
पायल तडवी ही रॅगिंगची बळी ठरली असून यासंदर्भात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी या महाविद्यालयात न झाल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप वसंत पुरके यांनी केला आहे. त्यामुळे या महाविद्यालयाच्या अधिष्ठांतावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.