यवतमाळ - आज दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव तालुक्यातील गुंज बसस्थानकाजवळील पूल वाहून गेला आहे. या पुलाचे अर्धवट काम झाल्याचे नागिरक बोलत आहेत. या घटनेमुळे पुसद, माहूर आणि महागाव या गावांचा संपर्क तुटला आहे. पूल वाहून गेल्याने येथील घरांसह दुकानांमध्ये या पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे येथील घरांचे, दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अर्धवट पुलाच्या कामामुळे तीन गावांचा संपर्क तुटला - यवतमाळ जिल्हा
मुसळधार पावसामुळे महागाव तालुक्यातील गुंज बसस्थानकाजवळील पूल वाहून गेला आहे. या घटनेमुळे पुसद, माहूर आणि महागाव या गावांचा संपर्क तुटला आहे.
'ग्रामस्थांची बांधकाम विभागाला वारंवार तक्रार'
महागाव तालुक्यातील गुंज बसस्थानकावरील पुलाचे काम संबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडले. काम करत असताना पुलाच्या दोन्ही बाजूने मातीचे बांध टाकल्यामुळे हा पूल वाहून गेला आहे. यामुळे नाल्याकाठी आसलेल्या घरे व बसस्थानकावरील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने पाण्याला जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याला वेगळी वाट काढून दिल्याने पाण्याचा पूर ओसरू लागला आहे. ग्रामपंचायतकडून पुलाच्या अर्धवट कामाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार देण्यात आली होती. पावसाळ्यात पुलाला मोठा पुर येतो, त्यामुळे संबंधित विभागाने ही कामे करावीत अशी मागणी केली होती. मात्र, याकडे बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. आता तरी यामध्ये लक्ष घालून संबंधीत कंपनी व ठेकेदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.