यवतमाळ - 'सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे' या म्हणीला तंतोतत खरी ठरवणारी कहाणी आहे वैष्णवी येवले या चिमुकलीची. सहा महिन्यांची असताना ऑटो अपघातात अपंगत्व आले. कंबरेला इजा झाली, पाय निकामी झाले. मात्र, याही परिस्थितीत न खचता, न थांबता वैष्णवीची प्रेरणादायी वाटचाल सुरू आहे.
अपंगत्वाशी दोन हात, दिव्यांग वैष्णवीची प्रेरणादायी वाटचाल दारव्हा तालुक्यातील पाळोदी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता 5 व्या वर्गात वैष्णवी शिकते. खूप शिकून शिक्षिका बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून परिस्थितीशी दोन हात करायला ती सज्ज आहे. वैष्णवी शाळेत गुणवंत विद्यार्थीनी म्हणून परिचित आहे. विशेष म्हणजे ती वर्गात अव्वल असते. तिला गायन, रांगोळी, चित्रकला आदी छंद आहेत. तालुकास्तरावर तिने अनेक बक्षीसे मिळवली आहेत. नुकत्याच दारव्हा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात तिने आपल्या कलेची चुणूक दाखवली. तिच्या सुमधुर आवाजातील 'आई माझी मायेचा सागर..' हे गीत ऐकून सारेच भारावून गेले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा पवार, शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, शिक्षणाधिकारी दिपक चवणे यांनी यावेळी तिचे भरभरुन कौतुक केले.
हेही वाचा -नमस्ते ट्रम्प : भारताची खरी ताकद ही देशाच्या नागरिकांमध्ये! - डोनाल्ड ट्रम्प
अवघ्या सहा महिन्यांची असताना २०१० साली झालेल्या अपघातानंतर वैष्णवीसह कुटुंबीयांचे जीवन पुरते पालटून गेले. अपघातात कमरेला इजा झाल्याने तिला अपंगत्व आले. रक्तपुरवठा होत नसल्याने पायाची हालचाल थांबली आणि तेथूनच तिच्या दुःखद प्रवासाला सुरुवात झाली. वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी २ लाखांच्यावर खर्च डॉक्टरांनी सांगितला होता. मात्र, घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाही. आरोग्याच्या समस्येसह तिच्या भविष्याची चिंता कुटुंबीयांनी सतावत होती. या अडचणींवर मात करण्यासाठी वैष्णवीला शिकवण्याचा निर्धार कुटुंबीयांनी केला आणि तिच्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. आई उर्मिला आणि वडील किशोर येवले हे दाम्पत्य वैष्णवीला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. तिला चालता येत नसल्याने वडील दररोज तिला शाळेत पोहचवतात. शिक्षणाच्या या साधनेमध्ये शाळेतली शिक्षकांची मोलाची साथ येवले कुटुंबीयांना लाभत आहेत. वैष्णवीचे वर्ग शिक्षक प्रमोद मोखाडे यांच्यासह साधना गुल्हाणे, भूपेश आवारे, सहदेव पवार, विशाल झाडे, संतोष इंगळे, संजय पवार, वंदना महाजन आदी शिक्षक वेळोवेळी या कुटुंबाला धीर देऊन प्रोत्साहित करत असतात. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांची उंच भरारी वैष्णवी घेईलच, यात तिळमात्र शंका नाही. या ध्येयप्राप्तीसाठी वैष्णवीला 'ईटीव्ही भारत'कडून शुभेच्छा.