यवतमाळ - जिल्ह्यात नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे या तालुक्यांचा 'ऑनफिल्ड' आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी त्यांनी नेर, दारव्हा आणि दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच दिग्रस येथील कोव्हीड केअर सेंटर आणि समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात क्वॉरंटाईन असलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
पालकमंत्री संजय राठोडांची थेट क्वॉरंटाईन सेंटरला धडक, कक्षातील नागरिकांशी साधला संवाद - संजय राठोड न्यूज
जिल्ह्यात नेर, दारव्हा, दिग्रस या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे या तालुक्यांचा 'ऑनफिल्ड' आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी त्यांनी नेर, दारव्हा आणि दिग्रस येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
नागरिकांना आधार देत कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. शासन, प्रशासन आपल्या सोबत आहे. काही अडचण असेल तर त्वरीत सांगा. येथे जेवण कसे मिळते, स्वच्छता नियमित होते का, आदीबाबत त्यांनी आपुलकीने विचारणा केली. कोविड केअर सेंटर तसेच क्वॉरंटाईनकरता अधिग्रहीत केलेल्या इमारतींमध्ये नियमित स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. येथील नागरिकांना मिळणाऱ्या जेवणाबाबत कोणतीही तक्रार येऊ देऊ नका. आहाराबाबत विशेष काळजी घ्या, अशा सुचना संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
दिग्रस येथील 295 नमुने तपासले असून यापैकी 22 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 12 जण उपचाराअंती बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर तालुक्यातील 145 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दारव्हा तालुक्यात आतापर्यंत 46 रुग्ण आढळून आले असून 3 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दारव्हा येथून सर्वाधिक 540 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तर नेर येथे आतापर्यंत 37 पॉझेटिव्ह रुग्ण आढळले असून 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 37 पैकी 22 जण फक्त 6 कुटुंबातील आहेत. जिल्ह्यात दारव्हानंतर नेर येथील सर्वाधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तालुक्यातून आतापर्यंत 480 नमुने तपासण्यात आली आहेत. तर आतापर्यंत बाहेर गावावरून आलेल्या 3 हजार 14 नागरिकांची नोंद प्रशासनाकडे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचना काटेकोरपणे पाळाव्यात असे आवाहन केले.