यवतमाळ - खरीप हंगामात अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोयाबीनचे बियाणे उलवलेच नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी विभागाला दिले.
...अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करा - पालकमंत्री संजय राठोड
अनेक शेतकऱ्यांचे पेरलेले सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन उत्पादक कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा बियाणे उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्ह्यात न उगवलेल्या सोयाबीन बियाणांच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली, त्यावेळी राठोड बोलत होते. जिल्ह्यात 9 लाख हेक्टरपैकी जवळपास अडीच लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात येते. ज्या शेतकऱ्यांचे बियाणे पेरणीनंतर उगवले नाही, त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे बिलासहीत अर्ज दाखल करावा. महाबीजच्या धर्तीवर संबंधित कंपन्यांनी बियाणे बदलवून द्यावे किंवा स्वत:च्या सीएसआर फंडमधून नुकसानग्रस्त् शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. मात्र, असे न करणाऱ्या बियाणे उत्पादक कंपन्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी एफआयआरसुध्दा दाखल केला जाईल. यापुढे न उगवलेल्या बियाणांबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार येता कामा नये, असे निर्देशही राठोड यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, बियाणे उत्पादक कंपन्यांचे सारस, इगल, ऋची, अंकूर, ग्रीनगोल्ड या सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.