यवतमाळ - मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला दिले.
अतिवृष्टीने नुकसान : पालकमंत्र्यांनी दिले तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश
सततच्या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून या पुरामुळे शेतातील पिके खरवडून गेल्याचे चित्र आहे. तसेच, शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसामुळे झाडांच्या शेंगांना कोंब फुटले असून कपाशीची बोंडे सुद्धा काळवंडून गेली आहेत. तूर, मूग, उडीद या पिकांनाही फटका बसला आहे.
जिल्ह्यात केवळ जून महिना वगळता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस बरसला. पेरणी झाल्यानंतर आलेल्या पावसामुळे पिकांची परिस्थिती चांगली राहिली. मात्र आता पीक हाती येण्याच्या वेळेस या महिन्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे हातचे पीक जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या शेंगांना तर कोंब फुटले असून कपाशीलाही फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. हातातील उभे पीक सततच्या पावसामुळे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना तत्काळ मदत देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामस्तरावरील यंत्रणेने नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावे. यात कोणतीही चालढकल केल्यास कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.
सततच्या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून या पुरामुळे शेतातील पिके खरवडून गेल्याचे चित्र आहे. तसेच शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन काढणीला आले असतानाच पावसामुळे झाडांच्या शेंगांना कोंब फुटले असून कपाशीची बोंडे सुद्धा काळवंडून गेली आहेत. जिल्ह्यातील उमरखेड, महागाव, पुसद, आर्णी, दारव्हा, राळेगाव, कळंब, यवतमाळ, नेर यासह इतर तालुक्यातील जवळपास 7 हजार हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद या पिकांना फटका बसलेला आहे. यावर्षी सोयाबीनचा पेरा 2 लाख 81 हजार 673 हेक्टरवर तर, कपाशीची लागवड 4 लाख 65 हजार 562 हेक्टरवर करण्यात आली आहे.