यवतमाळ - पांढरकवडा मार्गावरील मालानी बागमध्ये असलेल्या गोदामांना आज सकाळी अचानक आग लागली. याठिकाणी व्यापाऱ्यांची विविध वस्तूंची गोदामे आहेत. शहरातील व्यावसायिक याठिकाणी आपला माल साठवितात. साठविलेला हा माल आगीत खाक झाला. आगीत अनेक व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अद्याप नुकसानीचा आकडा निश्चित समोर आला नसला तरी 50 लाखांवर नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.
विविध वस्तूची 30वर गोदामे
या मालानी बागेत चप्पल, ऑटोमोबाइल, प्लास्टिक पिशवी, टाइल्स व इतर वस्तूंची गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी आली. मोक्षधामला लागून असलेल्या या गोदाम परिसरातून अचानक धुराचे लोट निघायला सुरवात झाली. आग लागल्याचे समजताच नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. जवळपास चार बंब घटनास्थळी दाखल झाले.
व्यावसायिकांची धावपळ
आगीत आणखी नुकसान होऊ नये म्हणून साहित्य हलविण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली. शहरालगत असलेली ही गोदामे अतिशय जुनी असून याठिकाणी आग लागण्यामागील कारण स्पष्ट झाले नाही. या परिसरात अग्निरोधक यंत्रणादेखील नसल्याने आग झपाट्याने पसरली. या आगीत व्यावसायिकांचे लाखांवर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.