यवतमाळ : जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात काही कर्मचारी जुगार ( Gambling In Yavatmal Zilha Parishad ) खेळत असल्याची गोपनीय माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्यावरून साफळा रचून धाड टाकली असता आठ कर्मचारी जुगार खेळतांना अटक करण्यात ( Avadhutwadi Police Action Against Gambling ) आली. ही कारवाई रात्री एक वाजताच्या सुमारास करण्यात आली. यावेळी घटनास्थळाहुन काही मोठे अधिकारी फरार झाल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेतच सुरु होता जुगार, धाड टाकून ८ जणांना पकडले ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
यावेळी प्रकाश वामनराव कुद्रुपवार ( वय ५३, रा प्रभात नगर यवतमाळ ), देवानंद विठ्ठलराव जामनकर ( वय ४८ रामशास्त्री नगर ), गणेश भीमराव गोसावी ( वय ५५, रा. शिवम कॉलनी लोहारा ), प्रकाश भैयालाल व्यास ( वय ५८, राहणार जिल्हा परिषद क्वार्टर, जामनकर नगर ), गुनवंत तुकाराम ढाकणे ( वय ४७, रा. साईराम किराणाजवळ, जामनकर नगर ), अनिल तुकाराम शिरभाते ( वय ४५, रा. साईराम किराणाजवळ, जामनकर नगर ), संदिप रामराव श्रीरामे ( वय ४५, रा. वैभवनगरी, बसवेश्वर भवन जवळ ) चरण तारासिंग राठोड ( वय ५३, रा. विदर्भ हाउसिंग सोसायटी ) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून मोबाईल, दुचाकी आणि चारकाकी वाहन असा ५ लाख चार हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी घटनास्थळावरून येरावत चव्हाण हा पसार झाला असून, त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
कारवाई होणार का?
या सर्व नऊ जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असून, याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक आपले काम घेऊन येतात. मात्र, त्यांना थातुरमातुर उत्तर देऊन आल्या पाऊली परत पाठवून कर्मचारी, अधिकारी आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त होऊन जातात. जे कार्यालय ग्रामीण भागाच्या लोकांच्या सेवेसाठी आहे त्याचठिकाणी अशाप्रकारे जुगार भरविला जात आहे, ही बाब जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय लोकांसाठी शरमेची आहे. या जुगार प्रकरणाने जिल्हा परिषेदेची लक्तरे वेशीला टांगली गेली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ नेमकी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.