यवतमाळ - 'मेळघाट येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. त्या कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या. त्यामुळे मृत्यूला जबाबदार असलेले अधिकारी शिवकुमार, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांची कुठेही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करून दीपाली चव्हाण यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार गंभीर आहे', असे मत माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी त्या प्रकरणाची चौकशी पोलीस व वनविभागाकडून सुरू आहे. या प्रकरणात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवकुमार यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. शासनाकडून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष आहे, असेही संजय राठोड यांनी सांगितले.