यवतमाळ - फुलसावंगी येथील मुन्ना या प्रयोगशील तरुणाचे हेलिकॉप्टर चाचणी घेताना 10 ऑगस्टला अपघाती निधन झाले. त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी शुक्रवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार निलय नाईक आणि आमदार नामदेव ससाणे यांनी भेट दिली. त्यांनी मुन्नाच्या कुटुंबाला तातडीने पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली.
शेख इस्माईल शेख इब्राहिम उर्फ मुन्ना हा 'मुन्ना हेलिकॉप्टर' या टोपण नावाने ओळखले जाणाऱ्या प्रयोगशील तरुणाने हेलिकॉप्टरची निर्मिती केली होती. हा प्रयोग यशस्वी करून ते हेलिकॉप्टर एअर अॅब्युलन्स किंवा शेतीसाठी फवारणी यंत्र म्हणून वापरण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, दुर्दैवाने हेलिकॉप्टरची चाचणी घेताना त्याचे अपघाती निधन झाले. या अपघाताने केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाल्याच्या भावना नितीन भुतडा यांनी व्यक्त केल्या.
इस्माईलचे केवळ आठवीपर्यंत शिक्षण
इस्माईल हा पत्रा कारागिर होता. त्याचा मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर होता. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अलमारी, कुलर अशी विविध उपकरणे बनवून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. हे करत असतानाच हेलिकॉप्टर बनविण्याचे स्वप्नही तो पाहत होता.