यवतमाळ- टिपेश्वर अभयारण्यात शनिवार सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वणवा पेटला. या आगीत मौल्यवान वनसंपदेसह वन्यजीवांची हानी झाली आहे. वणवा पेटल्यानंतर वन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. तेव्हा रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही आग नियंत्रणात आली.
टिपेश्वर अभयारण्य (संग्रहित व्हिडीओ )
टिपेश्वर अभयारण्यात आगी लागल्याच्या घटना नवीन नाहीत. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच सूर्य आग ओकत असून पारा ४० डिग्रीच्यावर पोहोचला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात आगी लागण्याच्या प्रकारात वाढ होत असते. शनिवार सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान टिपेश्वर अभयारण्य परिसरातील दर्यापूर, मारेगाव (वन), गणोरी, अर्ली या भागात वणवा पेटल्याची माहिती वन्यजीव विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली.
तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठा फौजफाटा घेऊन अग्निशामक साहित्यासह तात्काळ अभयारण्याकडे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तेव्हा रात्री २ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळाले. वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान सचिव यांच्यासह वनविभागाचे २०० अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. वनविभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी या आगीत अभयारण्यातील वनसंपदेची किती हानी झाली हे अद्याप कळू शकले नाही. तसेच या आगीमध्ये किती वन्यप्राण्यांच्या मृत्यू झाला याचीही माहिती अद्याप मिळू शकली नाही.
केळापूर, घाटंजी तालुक्यात तब्बल १४८.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विस्तारलेले टिपेश्वर अभयारण्य असून या ठिकाणी मौल्यवान वनसंपदेसह वन्यजीवांची भरमार आहे. वाघांच्या वाढत्या संख्येवरून टिपेश्वर अभयारण्य पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र, असे असले तरीही अलिकडेच टिपेश्वर अभयारण्य शिकाऱ्यांच्या रडारवर आले आहे.