यवतमाळ- जूनच्या सुरवातीला परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे 18 जूनपर्यंत उमरखेड तालुक्यातील मुळावा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी अटोपली. परंतु मुळावा व परिसरातील अधिकतर शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. परिसरातील शेतकरी अनिल बरडे यांच्या शेतातील दहा एकर सोयाबीनची उगवण न झाल्यामुळे त्यांनी शेतात ट्रॅक्टर फिरवला आहे.
दहा एकर शेतात पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्याने फिरवला नांगर, आता दुबार पेरणीचे संकट
पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे 18 जूनपर्यंत उमरखेड तालुक्यातील मुळावा परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी अटोपली. परंतु मुळावा व परिसरातील अधिकतर शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही.
अशीच परिस्थिती उमरखेड तालुक्यातील मुळावा, विडुल, ढानकी, बिटरगाव यासह इतर गावातही आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ कृषी विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सलग चार वर्षापासुन शेतकऱ्यांना कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी बोगस बियाणांच्या रूपाने शेतकरी वर्गावर दुबार पेरणीचे संकट आले आहे.
कृषी विभागाने याचे पंचनामे करून कंपनीवर कारवाई करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरवेळी सोयाबिन लागवडीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना जवळील जमापुंजी खर्च करावी लागते. परंतु बोगस बियाण्यांसारख्या संकटाने यात भर घालून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच यावर्षी शेतकऱ्यांचा कापूस, तूर याची खरेदी झाली नाही. ज्यांची खरेदी झाली त्यांना अध्यापही शासनाकडून रक्कम मिळाली नाही. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.