यवतमाळ -ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. रात्री जग झोपलेले असताना जगाचा पोशिंदा मात्र, कुडकुडत्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढतो. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर सध्या सर्वत्र हेच चित्र आहे. रात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक धोके पत्करावे लागत आहेत. साप, विंचू, हिंस्त्र वन्यप्राणी यांच्याकडून हल्ला होण्याची सतत भीती असते. मात्र, दिवसा सिंचन करताना योग्य दाबाची वीज मिळत नाही. त्यामुळे थंडीत शेतकऱ्यांना रात्री जागरण करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
नेर तालुक्यातील शेतकरी रात्री पीकांना पाणी देतात चक्राकार पध्दतीच्या विजेचा पुरवठा - नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपात लागवड केलेल्या कपाशीला बोंड अळीने पोखरल्याने त्यांना पीक उपटून फेकाव लागले. त्याच शेतात काही शेतकऱ्यांनी पुन्हा उसनवारी करून रब्बीच्या पिकांची व्यवस्था केली. याच शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी म्हणजे दिवाकर चव्हाण. त्यांनी 4 एकर शेतात हरभरा लावला आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून मिळणाऱ्या चक्राकार पध्दतीच्या वीज पुरवठ्यामुळे त्यांना रात्री बारा वाजल्यानंतर शेतात पाणी देण्यासाठी जावे लागते. दिवाकर चव्हाण आणि त्यांच्या सारखे अनेक शेतकरी या अशाच पद्धतीने रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जातात.
दिवसा योग्य दाबाचा वीज पुरवठा आवश्यक -
घरातील कर्तेपुरुष रात्री शेतात सिंचनासाठी जातात. त्यामुळे माय माऊलींचा जीव कायम टांगणीला असतो. पत्नीला चिंता लागून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा योग्य दाबाची वीज मिळावी म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या या भागात शेतीला वीज पुरवठा होत असताना तीन दिवस दिवसा आणि चार दिवस रात्री असा चक्राकार पध्दतीने वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिवसा मिळणारी वीजे कमी दाबाची असते. लाईन ट्रीप होते यामुळे मोटार व्यवस्थित सुरू होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने रात्रीच पिकांना पाणी द्यावे लागते.
रात्रीच्या वेळीही अनेक समस्या -
रात्री सिंचन करतानाही ट्रान्सन्सफॉर्मरमध्ये कधी-कधी बिघाड होतो. विज पंप किंवा मेनस्विचमध्ये ओल्या हाताने काम करणे जीवावर बेतण्याची शक्यता असते. साप, विंचू शिवाय जंगली जनावरांकडून विशेषतः रानडुक्कर, बिबट या वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची सर्वाधिक भीती आहे. यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रात्री सिंचन करावे लागत आहे.
टॉर्चच्या सहाय्याने करावे लागते सिंचन -
नेर भागातील युवा शेतकरी ऋषीकेश बोरखंडे यांनी दोन एकर शेतात हरभरा आणि तूर लागवड केली आहे. त्या पिकांना पाणी देण्यासाठी ते रात्री भावासह शेतात जातात. रात्री एका टॉर्चच्या सहाय्याने अंधारावर मात करत सिंचन करावे लागते, असे ऋषीकेश बोरखंडे यांनी सांगितले. रात्रीचे सिंचन करताना मजूर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या विपरीत परिस्थितीत शेतात सिंचन करताना पाय रोवून उभे राहावे लागते. सर्व अडचणी लक्षात घेता महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा योग्य दाबाची वीज द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.