यवतमाळ - सध्या शेतकरी जोमाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे शेतीमालाची विक्री न झाल्याने शेतकऱ्यांकडे पैसा नाही. अशा बिकट परिस्थितीतही बळीराजा काळ्या मातीत घाम गाळत आहे. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास साडे नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे.
या आठवड्यात राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील सुनंदा आत्राम व त्रिशक्ती हे मायलेक भर उन्हात आपल्या पाच एकर दगडी शेतजमिनीत घाम गाळत आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांनी आपल्या शेतातील अर्धा कापूस खासगी व्यापाऱ्याला मिळेल त्या भावात विकला. तर अर्धा कापूस अजूनही घरात पडून आहे. गेल्या तीन महिन्यात हाताला काम नव्हते, परिणामी त्यांच्या हातात पैसे नाही. मजूर लावले तर त्यांना पैसा कुठून देणार अशा प्रश्न असल्यामुळे संपूर्ण आत्राम कुटुंब भल्या पहाटेपासूनच शेतात राबत आहे. आता चांगल्या पावसाच्या आगमनाची प्रतिक्षा हे आत्राम मायलेक करत आहेत.