यवतमाळ - दिवाळी आली, मात्र अजूनही सीसीआय आणि पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्रे सुरू झालेली नाहीत. शेतकऱ्यांना नाईलाजाने त्यांचा कापूस हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १ हजार ५०० ते २ हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
सरकारने कापसाला ५ हजार ८२५ इतका हमी भाव जरी जाहीर केला असला, तरी आज शासकीय खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्यांचा कापूस ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपयांना विकावा लागत आहे. व्यापारी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची कोंडी करीत आहेत आणि कमी दराने कापूस खरेदी करीत आहेत. त्यामुळे, मायबाप सरकार आता तरी लक्ष द्या, शेतकरी लुटला जात आहे, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकरी देत आहेत.
आठ ते दहा रुपये किलोने वेचणी
सोयाबीन हातचे गेले. कापसावर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, अती पावसाने बोंडसड आणि बोंडअळी आल्याने शेतकरी अडचणीत सापडला. पहिल्या वेच्यात शेतातील कापूस संपत आहे. जे बोंड आहेत त्यात अळी निघत आहेत. अशात फुटलेला कापूस शेतकऱ्यांना ८ ते १० रुपये प्रति किलो दराने वेचणी करावा लागत आहे. त्यात 'मेटकरी' नावाचा व्यक्ती मजूर उपलब्ध करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून जादा पैसे उकळत आहे.
कर्जवसुलीसाठी सावकार दारात
कसा बसा कापूस घरी आणला तर कृषी केंद्र चालक उसनवारी मागण्यासाठी व कर्जवसुलीसाठी सावकार शेतकऱ्यांच्या दारात उभे राहात आहेत. त्यात दिवाळी असल्याने मजुरांचे कापूस वेचणीचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना खासगी व्यापारी किंवा खेडा खरेदी सुरू असलेल्या ठिकाणी कापूस विक्री करावी लागत आहे. त्यातच व्यापारी कापसात मॉईश्चर जास्त आहे, असे कारण सांगून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. यावर लक्ष देण्याची गरज आहे.