यवतमाळ - जिल्ह्यात पावसाने जून आणि जुलै महिन्यातही दगा दिल्यामुळे साडेसात लाख हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. येत्या २-३ दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर बळीराजासमोर दुबार पेरणी करण्याचे संकट उभे राहणार आहे. यावर्षी रोहिणी नक्षत्रानंतर मृग नक्षत्रातही पावसाने दगा दिला. तर, आर्द्रा नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्याने 82 टक्के पेरण्या पूर्णत्वास गेल्या आहे. आता शेतात कोवळे अंकुर दिसू लागले आहेत. मात्र त्याच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
खरीप हंगामाची भिस्त असलेले दोन नक्षत्र कोरडे गेल्याने आधीच शेतकरी दुष्काळाच्या सावटात आहे. त्यामुळे तब्बल महिनाभर पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र, आर्द्रा नक्षत्राने दिलासा दिल्याने किमान पेरण्या पूर्णत्वास गेल्या आहे.