यवतमाळ -सतत संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या वेदना दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यांच्यावर येणाऱ्या संकटांची मालिका काही केल्या कमी होत नाही. आधीच दुष्काळ, बोगस बियाणे आणि कीटकनाशकांचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांचे यंदा रासायनिक खतांच्या भाववाढीनेही कंबरडे मोडले जात आहे.
निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे यावर्षी खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे आर्थिक गणित बिघडणार असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षात जहाल विषारी कीटकनाशके, बोगस बियाणे आणि शेतमालाला हमीभाव न देता होत असलेली लूट यामुळे शेतकरी वैतागला आहे. अशात आता शासनाने रासायनिक खतावर २०० ते २५० रुपयांची वाढ केली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे झाले आहे. पेरणीच्या काळात खताची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून शेतकरी पावसाळ्या पूर्वीच रासायनिक खतांची खरेदी करतात. मात्र, यावेळी शेतकऱ्यांना खत घेतांना जास्तीचे पैसे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार आहे.
रासायनिक खतांच्या भाववाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले कृषी क्षेत्रावरील विविध संकटांसोबतच महागाई गगनाला हात पुरवत असल्याने शेती उपयोगी साहित्यांची दरवाढ शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. भाव पाडल्या जाऊन शेतमालाचा दर व्यापाऱ्याच्या घशात गेल्यावरच शेतमालाचे भावात वाढ होते. त्यात दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच यावर्षी रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे आता परवडणार नसल्याच्या भावना अनेक शेतकऱ्यांतून व्यक्त केल्या जात आहे.
शेतकरी हिताच्या गोष्टी करण्यात धन्यता समजणाऱ्यांनीच बळीराजाचे वाटोळे केले आहे. बियाणे आणि रासायनिक खतांचे वाढलेले दर पाहुन शेतकऱ्यांचे डोळे पाणावले जात असून २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याची शासनाची घोषणा दिवास्वप्नच ठरणार, असे चित्र सध्या दिसत आहे.