यवतमाळ- गरज ही शोधाची जननी आहे. शेतकऱ्यांना एकीकडे शेत मालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे उत्पादन खर्च वाढतच चालला आहे. हा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शेतकरी सतत प्रयत्नशील असतात. असाच प्रत्यय जिल्ह्यातील राळेगाव येथे आला आहे. येथील पांडुरंग महादेव ठाकरे या साठ वर्षीय जुगाडू रँचो शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूपासून पिकातील आंतरमशागत करण्यासाठी यंत्राची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेले हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने त्यांच्या या संशोधनाची पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांची पिके काही ठिकाणी आंतरमशागतीला आली आहेत. अतिवृष्टी आणि दुबारपेरणीतून आर्थिक संकटाला सामोरे गेलेला शेतकरी आता आंतरमशागतीच्या कामाला जोमाने लागला आहे. आंतरमशागत करताना माणसांवर,बैल, ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्राच्या सहाय्याने प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे शेतकरी आंतरमशागतीचे काम पूर्ण करुन घेत आहे. अशा परिस्थिती राळेगाव येथील शेतकरी पांडुरंग ठाकरे यांनी आपल्या पिकांची आंतरमशागत करण्यासाठी टाकावू वस्तूपासून आंतर मशातगती यंत्र बनविले आहे. हे यंत्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंतय उपयुक्त ठरणारे आहे.