यवतमाळ - शेतात पाण्याची सुविधा असूनही भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना अडचणी येतात. रामनगर तांडा येथील एका शेतकऱ्याने या अडचणीवर पर्याय शोधला आहे. हरिसिंग राठोड या शेतकऱ्याने सौर ऊर्जेचा वापर करून ओलिताची शेती केली आहे.
यवतमाळ तालुक्यातील रामनगर तांडा येथील शेतकरी हरिसिंग राठोड यांच्याकडे सात एकर शेती आहे. मात्र, भारनियमनामुळे शेतीत सिंचन करणे अवघड झाले होते. इतर कोरडवाहू शेतकऱ्यांप्रमाणे त्यांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. अशातच त्यांना महावितरण कंपनीच्या सौर ऊर्जा योजनेची माहिती मिळाली.