यवतमाळ- कोरोना विषाणूमुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या काळात कृषी क्षेत्राशी निगडीत आस्थापने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या कंपन्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मंडी, रासायनिक खतांची दुकाने सुरू राहतील. शेतकरी किंवा शेतमजूर यांना शेती करण्यासाठी मुभा राहील. शेतीसाठी उपयोगात येणारे भाडेतत्वावरील अवजारे वाहतूक करता येणार आहे. रासायनिक खते, किटकनाशके, बी-बियाणे बनविणारी व पॅकिंग करणारी युनीटे सुरू राहतील. शेतमालाची काढणी व पेरणी करणाऱ्या मशीन्स इतर कृषी अवजाराची राज्यांतर्गत व आंतरराज्य वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
'संचारबंदीमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत आस्थापने राहणार सुरू; अडकलेल्या मजुरांची करणार व्यवस्था' - नागरिक
औद्योगिक क्षेत्र, दुकाने किंवा वाणिज्य आस्थापना संचारबंदीच्या कालावधीत बंद आहेत. मात्र कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या कंपन्या, कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मंडी, रासायनिक खतांची दुकाने सुरू राहतील. शेतकरी किंवा शेतमजूर यांना शेती करण्यासाठी मुभा राहील.
केंद्र व राज्य सरकारतर्फे संचारबंदीचे आदेश पारीत झाले असताना काही भागात मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांच्या मूळ गावी स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवण्याबाबतच्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अडकलेले मजूर, गरीब नागरिक आणि गरजू नागरिकांची तात्पुरती राहण्याची व खाण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
औद्योगिक क्षेत्र, दुकाने किंवा वाणिज्य आस्थापना संचारबंदीच्या कालावधीत बंद असली, तरी येथे काम करीत असलेल्या कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कोणतीही कपात न करता मजुरी देण्यात यावी. तसेच त्यांना कामावरूनसुद्धा काढून टाकण्यात येऊ नये. जे कामगार स्थलांतरीत कामगारांसह भाड्याच्या घरात राहत आहे, त्यांच्याकडून घरमालकांनी एक महिन्याकरीता घरभाड्याची मागणी करू नये. जर अशा घरमालकांनी कामगारांना किंवा विद्यार्थ्यांना त्यांचे घर खाली करण्याबाबत जबरदस्ती केल्यास त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.