महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भूमी-अभिलेख उपाधीक्षकांचा उद्दामपणा, आमदारांना वेळ देऊन स्वतःच कार्यालयातून गेले निघून

वणी येथील भूमी-अभिलेख कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारायला लावून अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय कोणाचेच काम होत नाही, अशा अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

भूमी-अभिलेख कार्यालय

By

Published : May 24, 2019, 1:19 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यातील वणी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या कार्यालयाशी संबंधीत विविध तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी कार्यालयात जाऊन तक्रारींचा आढावा घेतला. मात्र, त्यावेळी भूमी-अभिलेख उपाधीक्षकांनी अर्ध्या तासात येतो, असे सांगितले आणि भ्रमणध्वनी बंद करून कार्यालयातून निघून गेले. त्यामुळे आमदार आणि कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले होते. यादरम्यान आमदारांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून अनेक तक्रारी मार्गी लावल्या.

भूमी-अभिलेख कार्यालायातील भोंगळ कारभारबद्दल माहिती देताना आमदार

आमदार बोदकुरवार यांनी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी नथ्थू काकडे या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. त्यांनी अतितातडीच्या शेतीच्या मोजणीसाठी रक्कम भरली होती. मात्र, मोजणीसाठी आर. टी. थेरे या भूमापकाने ६ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ४ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार शेतकरी काकडे यांनी भूमापकाला पैसे द्यायला आलो, असे आमदारांना सांगितले. त्यावेळी आमदार यांनी स्वतः भूमापकाला देण्यासाठी पैसै काढले. मात्र, मी पैसे मागितले नाही, असे म्हणत भूमापक थेरे यांनी वेळ मारून नेली.

ठरलेल्या दरापेक्षा तिप्पट पैसे भरून २ महिन्यात अतितातडीची मोजणी करून घेता येते. तिप्पट पैसे भरूनही शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे दिल्याशिवाय मोजणी करण्यात येत नाही, असे उपस्थितांनी सांगितले. सुनील माधव उपरे यांनी अतितातडीच्या शेत मोजणीसाठी तिप्पट पैसे १८ फेब्रुवारी २०१९ ला भरूनदेखील आजपर्यंत या शेतकऱ्यांची मोजणी अडवून धरली आहे. मात्र, आमदारांसमोर या शेतकऱ्यांची शेतमोजणी करून देण्याचे आश्वासन भूमी अभिलेख कार्यालायातील कर्मचाऱ्यांनी दिले.

कार्यालयात ५ भूमापक आहेत. प्रत्येकाने एका महिन्यात किमान १५ मोजणी करावी, असा नियम आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याला ७५ मोजणी व्हायला पाहिजे. मात्र, हा आकडा कधीच पूर्ण होत नाही. याउलट कार्यालयात कर्मचारी नाहीत, अशा सबबी सांगितल्या जातात, अशा प्रकारच्या कितीतरी तक्रारी आहेत. या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार चकरा मारायला लावून अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय कोणाचेच काम होत नाही.
भूमी अभिलेख कार्यालयातील कारभारात गोंधळ आहे हे तर सर्वज्ञात आहे. मात्र, आमदारांशी खोटे बोलून त्यांना वाट पाहायला लावल्याची घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे भविष्यात या प्रकरणाला कलाटणी मिळेल, असे बोलले जात आहे. उपाधिक्षकांच्या या वागणुकीची तक्रार उपसंचालकाना करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details