यवतमाळ- एक व्यक्ती 'एसपी यवतमाळ' नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन अनेक मित्रांकडे पैशांची मागणी करत असत. हा प्रकार लक्षात येताच एका फेसबुक मित्राने रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यावरून ते बनावट अकाऊंट बंद करून त्या भामट्या विरोधात शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचा फोटो सुध्दा बनावट अकाऊंटसाठी वापरण्यात आला आहे.
मॅसेंजरव्दारे संपर्क साधत पैशाची मागणी
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नावाने 'एसपी यवतमाळ' हे कार्यालयीन फेसबुक अकाऊंट आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात एका भामट्याने 'एसपी यवतमाळ' नावाने एक नवीन फेसबूक अकाऊंट तयार केले. त्यानंतर त्या अकाऊंटवरून चॅटिंग सुरू केली. तत्पूर्वी त्याने जिल्हा पोलीस अधिक्षकांचा फोटो आणि नाव वापरले. दरम्यान त्या भामट्याने पोलीस अधिक्षकांचे मित्र व नातेवाईकांशी मॅसेंजरव्दारे संपर्क साधत आर्थिक अडचणीत आल्याचे सांगितले. मित्रांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर पैशाची मागणी सुरू केली. गुगल पे असेल तर अर्जंट पैसे पाठवा असे मेसेज अनेकांना केले. या प्रकारामूळे एक फेसबुक मित्र गोंधळला आणि त्याने थेट पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देत चौकशी केली. त्यावेळी एसपी यवतमाळ नावाने बनावट अकाऊंट तयार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.