यवतमाळ -शेतकर्यांकडून कमी किमतीत तूर खरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती व नाफेडला जास्त भावात विक्री केली. या फसवणुकीप्रकरणी दारव्हा येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवकासह एका व्यक्तीला गजाआड करण्यात आले. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेने केली असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरि काशिनाथ गुल्हाने, अमीन बाहोद्दीन मलनस अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
दारव्हा तालुक्यातील शेतकर्यांकडून कमी किमतीत तुरीची खरेदी करून कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ दारव्हा येथे नाफेडला जास्त भावात विक्री केली. त्यात शासनाची १ कोटी ४१ लाख ८२ हजार ८६३ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक निबंधक अंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तथा प्रभारी मार्केटिंग अधिकारी यांनी १३ ऑक्टोबर २०१८ ला दारव्हा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता.