यवतमाळ - जिल्ह्यात एक अशी ग्रामपंचायत आहे की, त्या ठिकाणी केवळ 89 मतदार आहे. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 12 उमेदवार उभे आहेत. 'वागदा सायखेडा', असे त्या ग्रामपंचायतीचे नाव आहे. या गावातील मतदार पहिल्यांदाच आपल्या बोटावर मतदानाची शाही लावणार असून बिनविरोधची 45 वर्षाची परंपरा मोडीत काढणार आहेत.
केवळ पाच जागांसाठी होणार निवडणूक
वागदा सायखेडा ही सात सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. या गावाची लोकसंख्या केवळ दीडशे असून मतदारांची संख्या केवळ 89 इतकी आहे. सात सदस्यांमध्ये एक सदस्य बिनविरोध निवडून आलेला आहे. तर एका ओबीसी आरक्षणवर कुठल्या नागरिकाचा उमेदवारी अर्ज न आल्याने ही जागा रिक्त आहे. त्यामुळे केवळ पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे.
गावात तीनच वार्ड
वागदा सायखेडा या गावात केवळ तीन वार्ड असून वार्ड क्रमांक एकमध्ये 34 मतदार, वार्ड क्रमांक दोनमध्ये 29 मतदार तर वार्ड क्रमांक तीनमध्ये 26 मतदार आहेत. गावात दोन गट पडल्याने गावातील तरुणांनी निवडणूकीत सहभाग घेत प्रथमच या गावी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली जाणार आहे.