यवतमाळ - पांढरकवडा तालुक्यातील अर्ली गावातील एका शेतकऱ्याने टरबूज पिकासाठी वापरलेल्या मल्चिंग पेपरवरच सोयाबीन आणि तुरीची लागवड केली. परिणामी शेतातील निंदनाचा आणि अंतर्मशागतीच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहत असून, पिकांवर रोग पडण्याची शक्यताही कमी आहे.
मागील वर्षी त्यांनी कपाशीची लागवड केली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे त्यांनी ते पीक काढून जानेवारीमध्ये 2 एकरमध्ये टरबूज पिकाची मल्चिंग पेपरवर लागवड केली. त्यानंतर कोरोनाचे संकट आले आणि त्यामुळे टरबूज पिकाला लॉकडाऊनचा फटका बसला. अत्यंत कमी भावात पीक विकाव लागलं. आता मात्र, टरबूज पिकाची लागवड केल्यावर त्याच शेतातील मल्चिंग पेपरला काढण्यासाठी एकरी 1 हजार रुपये खर्च येत होता. शिवाय ड्रीप काढावे लागत होते. तसेच रोटावेटर करून नांगरणी करावी लागली होती. सर्व खर्च पाहता 6 ते 7 हजार रुपये खर्च येणार होता. त्यामुळे त्यांनी ही शक्कल लढवली.