यवतमाळ - नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केल्यावर सुध्दा रिपोर्ट लवकर मिळत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. या बाबींची दखल जिल्हा रुग्णालयाने घेतली आहे. चाचणीचा अहवाल लवकरात लवकर नागरिकांना कसा देता येईल, याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. त्याचे फलित म्हणून आता 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तिचा चाचणी अहवाल मोबाइलवर पाठविला जात आहे. परिणामी प्रयोगशाळेत चाचण्यांचा प्रलंबित आकडा शुन्यावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.
यवतमाळमध्ये 24 तासात कोरोना रिपोर्ट मोबाईलवर येतोय - डॉ. मिलिंद कांबळे
यवतमाळमध्ये लॅब सुरूयवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. यवतमाळ जिल्ह्यात नमुन्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळाच उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील सर्व नमुने नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स (एम्स), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स आणि अकोला येथील प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे दोन आठवड्यानंतर अहवाल प्राप्त होत असे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नमुन्यांची जलदगतीने तपासणी होणे आवश्यक आहे. याच गरजेतून 2 जून 2020 रोजी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
दिवसाकाठी तीन हजार चाचण्यासुरवातीला या प्रयोगशाळेत आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी केवळ एकच मशीन उपलब्ध होती. त्यानंतर काही महिन्यांनी दुसरी मशीन आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे दोन मशीन सुध्दा कमी पडू लागल्या. त्यामुळे नवीन जिल्हाधिकारी अमोल येडगे रुजू होताच त्यांनी प्रयोगशाळेत तीन अतिरिक्त मशीन उपलब्ध करून दिल्या. सध्या येथे पाच मशीनच्या सहाय्याने प्राप्त नमुन्यांची रात्रं-दिवस चाचणी करणे सुरू आहे. एका मशीनवर 24 तासात जवळपास 600 तपासण्या होत आहेत. पाच मशीनमुळे दिवसाकाठी 3 हजार चाचण्या होत आहेत. परिणामी प्रलंबित चाचणी अहवालाचा आकडा शुन्यावर आला आहे.
आतापर्यंत दीड लाखांहून अधिक चाचण्या'चाचण्यांसाठी 11 टेक्निशियन येथे कार्यरत आहेत. तसेच 3 जून 2020पासून 20 एप्रिल 2021पर्यंत या लॅबमध्ये आतापर्यंत 1 लक्ष 63 हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली, असे डॉ. विवेक गुजर यांनी सांगितले. तर, 'नागरिकांनीसुद्धा आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने पाठविताना आपला योग्य मोबाइल नंबर यंत्रणेला द्यावा. जेणेकरून चाचणी अहवाल त्याच मोबाइलवर पाठविता येईल. तसेच अहवाल प्राप्त झाल्यावर व संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला योग्य सहकार्य करावे', असे आवाहन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी केले आहे.