यवतमाळ- विभागीय आयुक्त पीयूष सिंह व अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी तेलंगाणा राज्य सिमेवरील पाटणबोरी (ता.पांढरकवडा) येथे भेट दिली. त्यांनी पाटणबोरी येथील स्थलांतरीतांसाठी उभारण्यात आलेल्या सोई-सुविधांची पहाणी केली असून मजुरांशी व्यवस्थेबाबत संवाद साधला. याबाबत मजुरांनी समाधान व्यक्त केले.
भेटी दरम्यान पांढरकवडा येथील सहाय्यक उपजिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी उपलब्ध व्यवस्थेची पोलीस आयुक्तांना माहिती दिली. तसेच इतर विभागाकडून माहिती जाणून घेतल्यानंतर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी जिल्ह्या बाहेरील कामगार, मजूरांचे प्रश्न हे सद्यस्थितीत महत्वाचे आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जीवनावश्यक वस्तू जसे भाजीपाला, फळे, दुध, औषधं आदी बाबी नागरिकांना नियमित मिळणे आवश्यक आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे नागरिकांना अन्नधान्य सुरळीत मिळत राहावे, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधितांना केल्या.