यवतमाळ - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जिल्ह्यातील पाणीटंचाई बाजूला पडली होती. निवडणूक आटोपताच प्रशासन पाणी टंचाईच्या कामी लागले आहे. मार्च महिन्यात केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील भूजल पातळीत ०.२२ मीटरने घट झाल्याचे निर्देशनात आले आहे. काही भागात टंचाईची तीव्रता नसली तरी सद्यःस्थितीत आठ खासगी विहिरींचे अधिग्रहण तर चार टॅकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाकडून साडेचार कोटींचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे
जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यातच आटोपली. त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाने आता पाणीटंचाई निवारण यावर लक्ष केंद्रित केले आहे. पाणी टंचाई आराखड्या मध्ये जिल्ह्यातील ७०० गावांचा समावेश असून या गावांवर पाणीटंचाई निवारण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. सद्यस्थितीत दारव्हा व पुसद तालुक्यात एक, वनी तालुक्यात ६ अशा ८ गावांसाठी आठ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर बाबुळगाव दारव्हा तालुक्यात प्रत्येकी एक तर पुसद तालुक्यात दोन असे चार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गतवर्षी पडलेल्या कमी पावसामुळे यवतमाळ शहर व जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. गेल्यावर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील ७२५ विहीरंचे अधिग्रहण आणि ११० टँकर सुरू करण्यात आले होते.