यवतमाळ- मोठ्या कष्ठाने पिकविलेला कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर यात ओलावा जास्त असल्याने जिनिंगमध्ये कापूस घेतला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्याने हताश होऊन कापूस बाजार समितीच्या आवारात आणून जमिनीवर रिचविला आहे. इतकेच नव्हे तर हा कापूस खरेदी केला नाहीतर पेटवून देणार असे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे बाजार समिती प्रशासनात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-कोरोना विषाणूवर प्रभावी प्रतिजैवक विकसित केल्याचा इस्त्रायलचा दावा
दिलीप जैस्वाल (पिंपरीबुटी) असे शेतकऱ्यांचे नाव आहे. शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. हातात पैसे नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेतीतून निघालेला कापूस आतापर्यंत घरात साठवून ठेवला होता. कापूस खरेदी सुरू झाल्यावर शेतकरी विक्रीसाठी बाजार समितीत जात आहेत. दिलीप जैस्वाल कापूस घेऊन जिनिंगमध्ये गेले होते.
मात्र, कापसात ओलावा असल्याचे सांगून कापूस घेण्यास नकार दिला. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात कापूस रिचवून संताप व्यक्त केला. कापसात ओलावा नसल्याचे शेतकरी जैस्वाल यांनी सांगितले. तर कापूस जिनिंगमध्ये पाठविल्यावर कर्मचारी ओलावा किती याची तपासणी करतात, असे बाजार समितीचे सभापती रवी ढोक यांनी सांगितले. उद्या परत हा कापूस जिनिंगमध्ये नेऊन तपासनी करण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सभापती रविंद्र ढोक यांनी सांगितले.