यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील कुंभा येथे संचारबंदी दरम्यान अवैधरीत्या देशी दारूची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुसार पोलिसांनी धाड टाकून जवळपास 7 लाख 50 हजार रुपयांची दारु जप्त केली. वणी उपविभागातील ही दुसरी कारवाई असून, सर्वात मोठी कारवाई आहे. कारवाईत सुमारे 24 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी दिली.
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथून नायक यांना कुंभा येथून दारूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून कुंभा येथील राहुल जयस्वाल यांच्या भट्टीजवळ काही वाहने उभे असल्याचे दिसले. त्यांची चौकशी केली असता त्यापैकी एक गाडी तिथून पळून गेली आणि दोन गाड्या घटनास्थळीच उभ्या होत्या. वाहन (एमएच 32 जी 9088) स्कॉर्पियो गाडीमध्ये 50 पेट्या देशी दारू तसेच दुसऱ्या गाडीमध्ये (एमएच 29 बीसी 1616) काही लोक बसून होते. तर फरार झालेले वाहनामध्ये (एमएच 29 एडी 2383) राहुल जयस्वाल आढळून आले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आरोपी वेळाबाई मोहदा मार्ग पळून गेला असल्याचे सांगितले.