यवतमाळ - ३३ केव्ही सब स्टेशनच्या कार्यालयात भर दुपारी दारू पार्टी रंगली. या पार्टीचा उपकार्यकारी अभियंत्याने व्हिडिओ बनवला. मात्र हा व्हिडिओ तब्बल एका महिन्यानंतर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना फुलसावंगीच्या वीज वितरणच्या कार्यालयात उघडकीस आली. फुलसावंगीच्या कार्यालयावर ४२ गावांचा भार आहे. मात्र या वीज केंद्रातील कार्यालयात भरदुपारी चक्क दारूची ओली पार्टी रंगत असल्याने नागरिकांना धक्काच बसला आहे. दरम्यान ओली पार्टी करणारे दोन कर्मचारी निलंबीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फुलसावंगी येथील वीज वितरण कार्यालयातील प्रकारफुलसावंगी येथील ३३ केव्ही सब स्टेशनचे कामकाज अनेक महिन्यापासून प्रभारी अधिकाऱ्यावर आहे. येथे ४२ गावांचा वीज पुरवठा करण्याचा भार असून सुद्धा कर्मचाऱ्यांची अतिशय तोकडी संख्या उपलब्ध आहे. त्यातील अनेक कर्मचारी नियमांना तिलांजली देऊन उपडाऊन करत आहेत. त्यातच जीर्ण झालेल्या वीज तार वारंवार नादुरुस्त होतात. एकंदरीत येथील ३३ केव्ही सबस्टेशन एक ना अनेक समस्यांना तोंड देत आहे. त्यातच सोमवारी दिवसभर समाज माध्यमातून येथील कार्यालयातील मद्यपार्टीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत होता.
बिअर बारला पण लाजवेल असे चित्रफुलसावंगी कार्यालयातील भरदुपारी ऑपरेटरच्या टेबलावर एखाद्या बिअर बारला पण लाजवेल असे चित्र पहावयला मिळाले. त्या टेबलावर नियमित दारू पिणारे जे मसालेदार बॉईल अंड्डे, चकना म्हणून उपयोगी होत असलेली पुडी, बंद खरमुरे व सर्वात महत्वाचे म्हणजे दारूने भरलेला ग्लास असे चित्र त्या टेबलाचे होते. या व्हिडिओतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व सुरू असतानाच एक तरुणी कर्मचारी दूर एका टेबलावर आपल्या कामात व्यस्त दिसत आहे. त्या संबंधित दारू पार्टी करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलीच्या वयाची मुलगी येथे बसून असल्याचा देखील भान राहिले नाही. हा प्रकार अनेक दिवसापासून की महिन्यापासून सुरू असल्याचा अंदाज लावणे कठीण असले, तरी त्या टेबलावरील सेटप पाहून सर्व साहित्य अनेक वेळ वापरल्या गेल्याचा संशय येतो.