महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली; परजिल्ह्यावर राहावे लागतेय अवलंबून - yawatmal oxygen demand

यवतमाळमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली आहे. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेला परजिल्ह्यातील यंत्रणांवर अवलंबून राहावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिली तर, कोविड यंत्रणाच ऑक्सिजनवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

yawatmal oxygen situation
यवतमाळ ऑक्सिजन परिस्थिती

By

Published : Sep 20, 2020, 5:41 PM IST

यवतमाळ -जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. तर दुसरीकडे, जिल्ह्यातील ऑक्सिजनचीही मागणी वाढत चालली आहे. सुरुवातीला दर दिवशी दीड हजार ते एक हजार 700 ऑक्सिजन सिंलिडर लागत होते. आता महिनाभरात जिल्ह्यात 3 हजार 500 ते 4 हजार ऑक्सिजन सिलिंडरची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यात याची निर्मिती होत नसल्याने या ऑक्सिजनसाठी देवळी (वर्धा) आणि नागपूर या शहरांवर अवलंबून राहावे लागत आहे.

यवतमाळ ऑक्सिजन परिस्थिती.

हीच परिस्थिती राहिली तर, कोविड यंत्रणाच ऑक्सिजनवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाकडूनजिल्हा समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती दैनंदिन ऑक्सिजनची गरज आणि ती पुरविणाऱ्या बॉटलिंग प्लांट, बल्क सप्लायर्स यांच्या सतत संपर्कात राहून तसेच प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल, यावर लक्ष देणार आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 300 अ‌ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. यातील बहुतांश रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. वसंतराव नाईक जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात देवळी येथील आदित्य एअर प्रॉडक्ट कंपनीकडून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येते आहे. सुरुवातीला दररोज 500 ऑक्सिजन सिलिंडर येत होते. आता दररोज 1 हजार सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता आर. पी. सिंह यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात 11 कोटींचा ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या माध्यमातून दोन महिन्यात प्लांट सुरू होऊन जवळपास 800 ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार आहे. तसेच यवतमाळ तालुक्यातील चिचबर्डी येथे डॉ. संजीव जोशी यांचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट आहे. या प्लँटला नागपूर येथील आयनॉक्स लिमिटेड फार्ममधून सुरुवातीला 1 हजार लिटर ऑक्सिजन लिक्विड येत होते. मात्र, नागपूरमधील रुग्णसंख्या वाढत असल्याने या कंपनीकडून आता 7 हजार 500 लिटर लिक्विड स्वरूपात ऑक्सिजन पुरवठा होत आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी सरासरी 200 ने वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details