यवतमाळ - महागाव तालुक्यातील काळी दौलतखान शुक्रवारी (दि. 3) येथे एका तरुणाचा खून (Murder) झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त जमावाने जाळपोळ करत अनेक दुकानांची तोडफोड केली होती. काळी दौलतखान येथे जमावबंदीचा आदेश देण्यात आले आहे. मात्र, तरुणाच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गावात लगतच्या जिल्ह्यातील पोलीस दल, दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
काळी दौलतखान या गावात दुचाकीवरून जाताना एका तरुणाला दुचाकीचा कट लागला. यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर होऊन श्याम शेषराव राठोड (वय 22 वर्षे) या तरुणावर तलवारीने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. त्यामुळे या गावात दोन गटात तणाव निर्माण झाला. तणाव चांगलाच वाढला असून गावातील रात्रीच्या सुमारास दुकानाची जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्याचा मारा पोलिसांकडून करण्यात आला होता.