यवतमाळ - बोलेरो वाहनांमधून जनावर तस्करी होत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना ( traffic police ) मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून तस्करीचे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जनावर तस्करांनी ( animal smugglers ) थेट वाहन पोलिसांच्या तसेच बजरंग दलाच्या ( Bajrang Dal ) कार्यकत्यांच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत बजरंग दलाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले. ही गंभीर घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास यवतमाळ धामणगाव मार्गावर घडली. अभिमन्यू विजय फूलकर (19) रा. दाभा पहूर ता. बाभूळगांव, सागर विजय सोनोने (24) रा. इंदीरा नगर बाभूळगांव असे जखमींची नावे आहे. तर, अमोल केशवराव चाटे (35) रा. यवतमाळ असे फिर्यादी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
दोघेही गंभीर जखमी -पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबुळगाव मार्गे एक मालवाहू बोलेरो वाहन क्रमांक एम एच 30 बी. डी. 4168 हे यवतमाळ कडे येत असल्याची माहिती बाभूळगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी मिळाली होती. त्यावरून वाहतूक पोलिस कर्मचारी अमोल चाटे यांनी धामणगाव बायपासवर दोन खाजगी व्यक्तींना घेऊन सदर वाहनाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, वाहन चालकाने वाहन न थांबवता अभिमन्यू फूलकर, सागर सोनोने अमोल चाटे यांच्या अंगावर घातले. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये चाटे यांच्या दुचाकी क्र. एम. एच. 29 बी.क्यु. 2683 या वाहनाचा अक्षरशः चुरडा झाला. याच दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटून बुलेरो वाहन झाडावर आदळले. यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावर तस्करीचा प्रकार उघडकीस आला.