यवतमाळ-जिल्ह्यात मागील सात दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. यवतमाळ तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बेचखेडा, रूई वाई, रामनगर तांडा, किन्ही, अर्जुना या परिसरात असलेल्या शेतातील कपाशी, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडले आहेत.
हेही वाचा-ऊसतोड मजुरांना रोखले, अटकेनंतर आमदार सुरेश धसांची अर्ध्या तासातच सुटका
सुरुवातीच्या दिवसात पाऊस कमी झाला होता, मात्र, पावसाने नंतर दमदार हजेरी लावली. बैलपोळा सण झाल्यानंतरही पाऊस सुरू आहे. दुपारच्या वेळी पाऊस होत असल्याने शेतामधील कामे शेतकरी, शेतमजुरांना करता येत नाहीत. पीक वाढल्याने निंदण, फवारणी, युरिया देण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे या कामात अडथळा निर्माण होतोय.
सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्यांच्या संकटात आणखीच भर पडत आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत असल्याने नाल्यांचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे कपाशीचे पीक पूर्ण आडवे झाले. रामनगर तांडा येथील विनोद चव्हाण, सुरेश चव्हाण, सुनील चव्हाण, वसंता जाधव, निलेश जाधव यांच्या बेचखेडा येथील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.