यवतमाळ- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन कापणीच्यावेळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे पीक खराब होत आहे. काढायला आलेला कापूस पावसामुळे ओला झाला आहे. तसेच तूर, उडीद, मूग या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस परतीच्या पावसाने पुसद, उमरखेड, नेर, दारव्हा, आणि महागाव यांसह इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार तडाखा दिला. या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सतत परतीचा पाऊस सुरू आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिग मारून ठेवले आहे. काही शेतकऱ्यांनी दिवाळी सणासाठी मळणी यंत्रातून सोयाबीन काढून विक्री केली. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन अद्यापही शेतातच आहे. या पावसामुळे सोयाबीनला मोठा फटका बसला.
सोयाबीनच्या ढिगात पाणी शिरल्याने सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत. मोठ्या प्रमाणात सोयाबीन सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, कृषी विभागाने काही परिसरात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. शेतातील कपाशीलाही परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. पावसामुळे बोंडे गळतीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे कपाशीच्या उतारीत घट येण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे मागणी शेतकऱ्यांकडून होत असून तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.