यवतमाळ - जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर खरेदी घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. व्यापाऱ्यांनी तब्बल 11 हजार 700 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस नोंदणी करून कापूस विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेला 11 हजार 700 संशयित शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी थांबवली आहे. या संदर्भातील चौकशी आता सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांची नोंदणी करून टोकन पद्धतीने कापूस खरेदीला सुरवात झाली. नेमका याचाच फायदा व्यापाऱ्यांनी उचलला. या काळात व्यापारी शेतकऱ्यांकडूनचा कापूस अत्यंत कमी किंमतीत विकत घेऊन तोच माल सीसीआयला दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर चढ्या किमतीत विकण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला होता.
सात बारा शेतकऱ्याचा मात्र, मोबाईल नंबर आणि बँकेचे खाते मात्र व्यापारी आपले दाखवायचे. असा गोरखधंदा या व्यापाऱ्यांनी सुरु केला होता. कापूस खरेदीत घोटाळा होतो आहे अशी शेतकऱ्यांकडून ओरड सुरु झाली होती. या संपूर्ण प्रकारात जिनिंग प्रेसिंगचे मालक, ग्रेडर आणि वरिष्ठ अधिकारी यांची मिलीभगत असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणे शक्य नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केेला होता. या संदर्भात शेतकरी नेत्यांनी आवाज उचलला. तेव्हा कुठे सरकारला जाग आली.