यवतमाळ - यावर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन पीक पूर्णता वाया गेले. तर आता नगदी पीक असलेल्या कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाला आहे. कपाशीचा लागवड खर्चही निघत नसल्याने मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका शेतकऱ्याने दोन एकर कपाशीवर तणनाशकाची फवारणी करून हे पीक नष्ट केले.
कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव; तणनाशक फवारून दोन एकर पीक केले नष्ट - insect on cotton crop
कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी पूर्णता हवालदिल झाला आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका शेतकऱ्याने दोन एकर कपाशीवर तणनाशकाची फवारणी करून हे पीक नष्ट केले.
जिल्ह्यात यावेळी पावसाने दमदार हजेरी लावली. शेतातील कपाशी दिमाखदारपणे उभी होती. कुंभा येथील युवा शेतकरी वरुण ठाकरे या युवकाला या हंगामात कपाशीच्या पिकाकडून मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती. पण ऐन वेचणीच्यावेळी उभ्या कपाशीच्या पिकावर बोंड अळींनी आक्रमण केले. आणि कपाशीचे पीक मातीमोल झाले. या शेतकऱ्याने सहा एकर कपाशी लागवड केली होती. प्रत्येक झाडाला बोंडही चांगले लागले होते. मात्र दोन एकरातील कपाशीच्या प्रत्येक झाडावरील 40 ते 50 बोंडामध्ये बोंड अळीचे संक्रमण झाल्यामुळे पूर्ण पीकच हे हातून गेले आहेत.
केवळ चार क्विंटल कापूस घरी आल्यानंतर ही बोंडअळी संपूर्ण पीक उद्ध्वस्त करेल हे लक्षात आले. त्यामुळे ठाकरे यांनी दोन एकरावरील उभ्या कपाशीवर तणनाशक फवारले आणि ते पीक नष्ट केले. जिल्ह्यात वरुण ठाकरे सारखे अनेक शेतकरी आहेत की ज्यांच्या कपाशीवर बोंडअळींनी संक्रमण केले आहे. त्यामुळे शासनाने अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.