यवतमाळ - आजकाल शेतीमध्ये काही राहीले नाही. शेतीमध्ये खुप जोखीम असते. त्यापेक्षा नोकरी परवडली, अशी अनेक वाक्ये आपल्या कानी पडतात. त्यामुळे घरची जमीन असूनही आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतो. परंतु यवतमाळमधील जय भगत या उच्चशिक्षित तरूणाने ३५ हजार पगाराच्या नोकरीवर लाथ मारून घरची शेती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचे स्वप्न निसर्गाच्या दुष्टचक्रात भंगणार की काय? अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. मागील २२ दिवसापासून पाऊस न आल्याने शेतातील कपाशीचे पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.
जय भगत या तरूणाने जेडी आर्ट, बीए, अॅनिमेशन इंजिनिअरिंग असे उच्चशिक्षण घेतले. त्याच्या कर्तुत्वावर त्याने हैदराबाद येथे नोकरी मिळवली. परंतु दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा घरची मालकी बरी, असे म्हणत त्याने आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने शेतात कपाशीची लागवड केली. परंतु, पावसाने दडी मारल्याने सध्या हा युवा शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे.