यवतमाळ - कोरोना विषाणूने (कोव्हीड-2019) ने सध्या संपूर्ण जगात संकट उभे केलेआहे. यापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय स्तरावर 'कॉरेंटाईन वॉर्ड' (विलगीकरण कक्ष) तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात ‘104’ हा टोल फ्री क्रमांक चोवीस तास कार्यरत करण्यात आला आहे.
सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी आणि नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून नागरिकांना शंका-कुशंकाचे निराकरण करता येणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले आहे.