यवतमाळ -अमरावती शिक्षक मतदार संघासाठी आज कोव्हिड पॉझिटिव्ह असलेल्या शिक्षक मतदारांनी पीपीई किट घालून मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रावर आज शिक्षक मतदारसंघासाठी मतदान करण्यात आले. यावेळी निवडणूक विभागाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विलगीकरण कक्ष उघडण्यात आले होते. जे शिक्षक तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची तपासणी करूनच मतदानासाठी मतदान कक्षात पाठवण्यात आले.
तपासणीत आढळले होते पॉझिटिव्ह
राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 600वर कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालय हे 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत. यावेळी जिल्ह्यातील शिक्षकांची तपासणी करण्यात आली होती. यात पॉझिटिव्ह आढळलेल्या शिक्षकांना 14 दिवस गृह विलगीकरणमध्ये ठेवण्यात आले होते.
जिल्ह्यातील शंभरावर शिक्षक पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील शिक्षकांच्या तपासणीमध्ये शंभरावर शिक्षक पॉझिटिव्ह आले होते. त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून मतदान केंद्रावर ती विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष, त्यांची आरोग्य तपासणी, पल्स ऑक्सीमिटर, सॅनिटाईझ करूनच मतदान कक्ष येथे पाठवण्यात आले.