यवतमाळ -आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका 62 वर्षीय रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. इतर सात जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या हा 62 वर्षीय रुग्ण व्हेंटीलेटरवर असून त्याला सुरुवातीपासून रक्तदाब, रिनल फेल्युअर(किडनी संबंधित आजार) आणि न्युमोनियाचा आजार आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक; आयसोलेशन वॉर्डातील 32 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका 62 वर्षीय रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. इतर सात जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर वेळोवेळी उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 158 जण भरती आहेत. मागील 24 तासांत 48 जणांना भरती करण्यात आले आहे. नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या रिपोर्टपैकी 32 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत. यापैकी सहा नमुने पुनर्रतपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
शनिवारी एकूण 52 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आत्तापर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या वैद्यकीय नमुन्यांपैकी 136 नमुन्यांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. तर आतापर्यंत एकूण 170 निगेटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत.