यवतमाळ - गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र झटत आहे. स्वतः जिल्हाधिकारी प्रत्यक्ष जाऊन ठिकठिकाणच्या कामकाजाचा आढावा घेत आहेत. असे असूनही नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत या भागातील प्रतिबंधित क्षेत्र, होम आयसोलेटेड आणि होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या घरातील कचरा हा शहरातील इतर सामान्य कचऱ्या सोबत एकत्र केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या 'प्रदुषण नियंत्रण मंडळा'ने अशा भागातील कचऱ्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावावी याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक प्रशासनाला तसे आदेशही दिले आहेत. मात्र, त्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात 215 प्रतिबंधित क्षेत्र असून 196 नागरिक होम आसोलेशनमध्ये आहेत तर, अनेक जण होम क्वारंटाईन आहेत. पॉझिटिव्ह किंवा संशयितांच्या थेट संपर्कात आलेल्या घरातील मास्क, हॅन्ड ग्लोव्हज, औषधांची रिकामी पाकीटे, इंजेक्शन्स, औषधांच्या बाटल्या व त्यांच्या खोलीतील इतर कचरा हा पिवळ्या पॉलिथिनमध्ये एकत्र करून नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतच्या अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाकडे देण्यात यावा, असे सक्त आदेश दिले गेल आहेत. मात्र, हा कचरा इतर सामान्य भागातील कचऱ्यासोबत गावाबाहेर एकाच ढिगाऱ्यावर टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.