यवतमाळ - कोरोनाचा प्रादुर्भाव हा शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवितांना नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करून त्यांचे प्रबोधन करणे तसेच कोविड साखळी तोडण्यासाठी शहरी भागात प्रभागस्तरीय तर ग्रामीण भागात ग्रामस्तरीय समिती आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आवाहन केले आहे. या समित्यांच्या माध्यमातून 5 मे ते 25 मे या कालावधीत जिल्ह्यात जाणीव, जागृती व खबरदारी मोहीम राबविण्यात येत आहे.
मनातील भीती दूर करण्याचे काम -
जिल्ह्यात ग्रामस्तरीय व प्रभागस्तरीय कोरोना नियंत्रण समिती सक्रिय करून समितीमार्फत आजारी, कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या लोकांची माहिती घेणे, त्यांची पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन पातळी तपासणे, लक्षणे असलेल्या लोकांची चाचणी करून उपचाराच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच लोकांच्या मनामध्ये कोविडबाबत, तपासणीबाबत असणारी भीती दूर करणे, कोविड हा आजार लवकर निदान झाले तर बरा होऊ शकतो, हे नागरिकांना पटवून देणे. कोविडसदृश्य लक्षणे असतांना आजार अंगावर काढला आणि चाचणी न करता औषधोपचार घेऊन वेळ वाया घालविला किंवा चाचणीसाठी उशीर केला तर उपचारातील महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घेण्याचे आवाहन यातून करण्यात येणार आहे.