यवतमाळ - कोरोना विषाणूचा संसर्ग शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन ‘हाय अलर्ट’वर आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासोबतच येथील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी त्यांनी पांढरकवडा, जोडमोह (ता. कळंब), झरीजामणी व मारेगावाचा आढावा घेतला. जोडमोह येथील वॉर्ड क्र. 1 आणि वॉर्ड क्र.4 चा काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या क्षेत्रात एकूण 305 घरे असून लोकसंख्या 1 हजार 355 आहे, तर संपूर्ण गावाची लोकसंख्या जवळपास 3 हजार 500 आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी आरोग्य विभागाच्या 7 व इतर भागासाठी 8 अशा एकूण, 15 पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.
पांढरकवडा येथील मशीद वॉर्डची पाहणी करताना मशीद वॉर्ड तसेच हनुमान वॉर्डाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा वाढविण्याचे आदेश दिले. प्रतिबंधित क्षेत्रात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवा. नगर परिषदेने शहरात आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटींग करा व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आवश्यकता असल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश दिले.