महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मास्क' हीच महत्वाची लस : मुख्यमंत्र्यांनी घेतला यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईहून व्हीसीच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक

By

Published : Sep 28, 2020, 5:08 PM IST

यवतमाळ : कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच प्रत्येक कुटुंबाची आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' ही मोहीम शासनाने हाती घेतली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला.

मुंबई येथून व्हीसीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व इतर अधिका-यांसोबत संवाद साधला.

वारंवार हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे या प्राथमिक बाबींची अंमलबजावणी केली तर, आपण निरोगी राहून कोरोनापासून वाचू शकतो. सर्वांना या मोहिमेचे गांभीर्य कळले असून प्रत्येक कुटुंब यात सैनिक आहे. 'मी सुरक्षित तर माझे कुटुंब सुरक्षित' ही भावना सर्वांनी ठेवावी. कोरोनावर लस कधी येणार माहिती नाही, मात्र सद्यस्थितीत तरी 'मास्क' हीच महत्वाची लस आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे ही मोहीम गांभिर्याने राबवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 6 लाख 56 हजार कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 4 लाख 89 हजार तर, शहरी भागातील 1 लाख 76 हजार कुटुंबाचा समावेश आहे. यासाठी जिल्ह्यात दोन हजार 861 टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. शहरी भागात 310 टीमद्वारे तर ग्रामीण भागात 2551 टीमद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन लाख 77 हजार कुटुंबाच्या गृहभेटी झाल्या असून जिल्ह्यात 43 टक्के सर्वेक्षणाचे काम झाले आहे. तर, को-मॉरबीड नागरिकांची संख्या 22 हजार 154 आहे. यात ग्रामीण भागात 17 हजार 492 तर शहरी भागात जवळपास पाच हजार को-मॉरबीड आहेत. यापैकी 800 जणांना वैद्यकीय संस्थेत रेफर करण्यात आले आहे. तसेच यापैकी 104 जण पॉझेटिव्ह आढळले असल्याची माहिती जिल्हाधिका एम.देवेंदर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details