यवतमाळ -राज्यात सत्तांतरानंतर शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. मात्र, तरीही भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) यांची अॅलर्जी असल्याचे दिसून येतं आहे. यवतमाळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी फोटो ट्रिकद्वारे केलेल्या लपवाछपवीतुन हा प्रकार पुढे आला आहे. दोन दिवसापूर्वी ओबीसींना राजकीय आरक्षणाचा न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर भाजपकडून दत्त चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बॅनर तयार करून आणले. शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व्यक्त करणाऱ्या या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांचे फोटो होते. हे बॅनर हाती धरून भाजपाने फोटोसेशन केले. हे फोटो काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल देखील केले. मात्र, या फोटोंना भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला.
ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांच्याच सत्तेतील मुख्यमंत्र्यांचा फोटो काढून टाकला आहे. वर्तमानपत्रांना बातम्या पाठविताना व सोशल मीडियावर प्रसिद्धी करताना भाजप पदाधिकाऱ्यांनी बॅनर वरील ओरिजनल फोटोवर ट्रिक करून दुसरे फोटो टाकले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मदन येरावार आणि जिल्हा भाजप अध्यक्ष नितीन भुतडा यांचे फोटो ओरिजनल फोटोवर टाकण्यात आलं. त्यामुळे नव्या सरकारमध्ये देखील भाजप व बंडखोर शिवसेना गटात सारे काही आलबेल नसल्याचे दिसून आले.