यवतमाळ - वणी तालुक्यातील चेंडकापूर गावात एकाच दिवशी १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आरोग्य पथक चेंडकापुरात पोहोचले. परंतु कोरोनाबाधित रुग्णांनी उपचार घेण्यासाठी येण्यास नकार दिला. यावेळी आरोग्य पथक व पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चांगलीच वादावादी झाली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलीस, महसूल प्रशासनाने मध्यस्थी करून तोडगा काढला. सर्व कोरोनारुग्णांना गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वादावर पडदा पडला.
आरोग्य पथकास विरोध; कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत झाली वादावादी - कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
आरोग्य पथक गावात पोहोचल्याचे दिसताच गावकरीही संतापले. यावेळी बाधित रुग्णांची बाजू घेत, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरीच ठेवा, असा आग्रह गावकऱ्यांनी धरला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. वारंवार विनंती करूनही रूग्ण उपचारासाठी येण्यास नकार देत होते.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत झाली वादावादी
ठाणेदार सचिन लुले व तहसीलदार विवेक पांडे आपल्या सहकाऱ्यांसह चेंडकापुरात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनीही बाधित रुग्णांना उपचारासाठी रूग्णालयात चलावे, अशी विनंती केली. परंतु, तरीही हे रुग्ण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर गावातीलच शाळेत या रूग्णांना ठेवून. त्यांच्यावर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर वातावरण शांत झाले.